ग्रामीण जीवन हा भारतीय संस्कृतीचा कणा मानला जातो. भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यांमध्ये राहते. खेड्यांतले जीवन साधेपणाने, निसर्गाशी एकरूप होऊन, श्रम आणि समाधानावर आधारलेले असते. शहरातील गडबडगोंधळ, प्रदूषण, यांत्रिकता आणि कृत्रिमतेच्या तुलनेत ग्रामीण जीवन अधिक शांत, निरामय आणि नैसर्गिक वाटते. लहवित गावात पाऊल टाकताच हिरवीगार शेते, पक्ष्यांची किलबिल, झाडांच्या सावल्या आणि निरागस माणसांची उबदार वागणूक अनुभवायला मिळते.
खेड्यातील जीवन माणसाला निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी देते. शेती ही लहवित गावाची प्रमुख ओळख असल्यामुळे शेतकरी राबतो, घाम गाळतो आणि आपल्या परिश्रमाने धान्य निर्माण करतो. शेतात उभे असलेले पिक पाहून शेतकऱ्याला मिळणारा आनंद हा शब्दांत मावणारा नाही. पावसाळ्यात हिरवळ पसरलेली शिवारं, हिवाळ्यात धुरकट धुके आणि उन्हाळ्यात थंड वारे हे सगळं लहवित गावामध्ये पाहायला मिळतं. ग्रामीण जीवनातील ही नैसर्गिक विविधता मनाला समाधान देणारी असते.
लहवित गावातील माणसांचे परस्परांशी नाते हे जिव्हाळ्याचे आणि आत्मीयतेचे आहे. एखाद्या घरात आनंदोत्सव असो की दुःखद घटना, संपूर्ण गाव एकत्र येतो. गावातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांची सुखदुःखे वाटून घेतो. हा परस्पर सहयोग हा लहवित गावातील ग्रामस्थानच्या जीवनातील एक मोठा गुण आहे. शहरातील एकाकीपणा आणि परकेपणाच्या तुलनेत लहवित गावातील माणूस माणसाशी जोडलेला दिसतो. म्हणूनच ग्रामीण जीवन अधिक मानवी आणि भावनिक नात्यांनी समृद्ध मानले जाते.
लहवित गावामध्ये सण-उत्सवांना वेगळीच धम्माल असते. दिवाळी, होळी, गणेशोत्सव, मकरसंक्रांत,शिवजयंती यांसारखे सण गावकरी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे करतात. बैलगाडा शर्यत, भजन-कीर्तन यांतून गावकरी आनंद लुटतात. लहवित गावातील हे उत्सव माणसांना एकत्र आणतात आणि सांस्कृतिक परंपरा जपतात. पारंपरिक लोककला, गोंधळ यांतून लहवित गावातील सांस्कृतिक श्रीमंती दिसून येते.
लहवित गावातील जीवन साधं असलं तरी ते श्रमप्रधान आहे. शेतकरी पहाटे उठून बैलांच्या जोडीला,ट्रॅक्टर घेऊन शेतात जातो. शेतातील काम, जनावरांची देखभाल, घरकाम या सर्वांत कुटुंबातील प्रत्येकजण सहभागी होतो. स्त्रिया रानात काम करतात, जनावरांची काळजी घेतात आणि घर सांभाळतात तसेच लहवित गावातील स्रिया या शिकलेल्या असल्याने जॉब करणाऱ्या स्रीयाही आढळतात . मुलं शाळेत जात असली तरी सुट्टीच्या वेळी शेतात किंवा घरकामात हातभार लावतात. श्रमाची जाण असलेली ही माणसं समाधानी असतात कारण त्यांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं असतं..
लहवित गावात आधुनिक सुविधा, दळणवळणाची साधनं, चांगले रस्ते, आरोग्य सेवा आणि उच्च दर्जाचे शिक्षण आहे. शेतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीवर जगावं लागत नाही कारण येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय करतात. त्याचप्रमाणे घरात घरात उच्च शिक्षित माणसे असल्यामुळे ते व्यवसाय तसेच नोकरी हि करतात. दुष्काळ, पुर, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागतं. तरीही शेतकरी आपल्या परिश्रमाने जगण्याची गाडी पुढे नेत असतो.
लहवित गावामध्ये नवीन तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट, आधुनिक शेती साधनं खेड्यांत पोहोचली आहेत. तरुण पिढी शिक्षण घेऊन प्रगती करत आहे. सरकारकडून ग्रामीण विकासासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.
लहवित गावात संस्कृतीचा जीवंत वारसा आहे. आपल्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेत ग्रामीण जीवनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच “भारताचा आत्मा हा खेड्यांत वसतो” असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं.
लहवित गावातील जीवन आपल्याला साधेपणा, श्रमाचे महत्त्व, निसर्गाशी नाते आणि माणुसकीची खरी जाणीव शिकवते. आधुनिकतेकडे वाटचाल करताना ग्रामीण जीवनातील या मूल्यांचा विसर पडू नये. खेडी जर सुखी आणि समृद्ध झाली, तर देशाचं संपूर्ण चित्रच बदलून जाईल. ग्रामीण जीवनातील हीच खरी ताकद आहे.